पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वाणिज्य विभाग आणि पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे विद्यापीठातर्फे बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे.
कुलगुरू कार्यालयात आयोजित बैठकीत कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जी. श्यामला यांच्यासह बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनिल करंजकर उपस्थित होते.
नागरी सहकारी बँकांना अनुभवी व कार्यक्षम मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांनी वाणिज्य विभागांशी संपर्क साधला होता. यानुसार विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाअंतर्गत बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसााठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम साकारण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा बँकेच्या कर्मचाऱ्यासोबतच वाणिज्य विभागांच्या विद्यार्थ्यांनाही लाभ होणार आहे.
“या अभ्यासक्रमातून वाणिज्य विद्यार्थी आणि बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये ज्ञाननिर्मितीसोबतच कौशल्य निर्माण करणे हा हेतू आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणातून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रासाठी मोलाची भर घातली पाहिजे.” – डॉ.सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ