पुणे, दि. 27 –तरुणाईत वाढत असलेलं नशेचं फॅड, त्यातून अमली पदार्थांची होत असलेली बेकायदा वाहतूक व विक्री याला आता पायबंद बसणार आहे. यासाठी पोलीस, अन्न व औषध प्रशासन तसेच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने एकत्रित पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे “दम मारो दम’ काही अंशी का होईना, कमी होण्याची आशा प्रशासनाला आहे.
नशेसाठी झोपेच्या गोळ्या अव्वाच्या सव्वा दराने विकणाऱ्या वाघोलीतील औषध विक्रेत्याला पोलिसांनी नुकत्याच बेड्या ठोकल्या. याबरोबरच चरस, गांजा, अफू विकणाऱ्या परप्रांतीयांची शहरात चलती असल्याचे वारंवारच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या अमली पदार्थांतून तरुणाई नशाचूर होत असून, हे थांबविण्यासाठी या तिन्ही विभागांनी एकत्र येत कठोर कारवाईचे अस्त्र उपसले आहे.
याबाबत अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीस केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे महेश जगताप, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दिनेश खिंवसरा, उपसंचालक विजय कानडे, लोहमार्गचे पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.
शहरात ऑनलाइनच्या माध्यमातूनही अमली पदार्थांची विक्री होत आहे. या माध्यमातून सौदा झाल्यानंतर टपालाने अमली पदार्थ पाठविण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी बऱ्याचदा कुरिअरचा वापर केला जातो. या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानुसार या प्रकाराला आळा घालण्यासाठी अशा प्रकारे होणाऱ्या विक्रीवर नजर ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर आणि विनायक गायकवाड यांनी समितीची कार्यपद्धती आणि कार्यवाहीची माहिती दिली.