पुणे, दि. 27 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल मल्टिमीडिया रीसर्च सेंटरनिर्मित (ईएमआरसी) “कमला-द स्वदेशी न्यूट्री-इंडियन’ या माहितीपटाला राष्ट्रीय स्तरावरील अकराव्या “नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये नामांकन मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसारतर्फे दरवर्षी सायन्स फेस्टिव्हल आयोजित केला जातो. हा माहितीपट डॉ. कमला भागवत सोहोनी यांच्या जीवनावर आधारित आहे. डॉ. कमला या केंब्रिज विद्यापीठातून विज्ञान विषयात पीएच.डी. करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. त्यांचे संशोधन देशातील लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहार-पोषण संशोधनाच्या त्या प्रणेत्या आहेत. माहितीपटाचे दिग्दर्शन माजी संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे, सहायक दिग्दर्शन मिलिंद पाटील, अजिता देशमुख यांनी संहितालेखन, आप्पा चिंचवडे (कॅमेरा), राम जाधव आणि प्रदीप भोसले (ध्वनी), राजेश देशमुख (सेट) आणि सिलास काकडे, फयाज शेख, खंडू भोसले, विजय काशिद आणि सुनील गायकवाड यांनीही सहाय्य केले आहे.