पुणे- पीएमपीच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त “बस डे’चे आयोजन करण्यात येणार आहे. 19 एप्रिल रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. तर “पुण्यदशम’ बसची सेवा मोफत असेल. यासह 20 एप्रिल रोजी महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
मात्र, दोन्ही दिवशी पालिका हद्दीबाहेरील प्रवाशांना कोणतीही सवलत मिळणार नाही. 19 एप्रिल रोजी पीएमपीचा 15 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यानिमित्त 14 ते 23 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. तर 18 एप्रिल रोजी 1 हजार 800 बसेसद्वारे प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे.
दि. 18 एप्रिल : कोथरूड डेपो ते डेक्कन, स्वारगेट ते वडगाव धायरी फाटा, स्वारगेट ते शिवाजीनगर (बाजीराव आणि शिवाजी रोड मार्गे), जंगली महाराज रोड, फर्गसन कॉलेज रोड या पाच मार्गांवर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने “डेडिकेटेड लेनद्वारे सेवा दिली जाणार आहे.
दि. 19 एप्रिल : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील प्रवाशांसाठी किमान तिकीट दर पाच रूपये आणि कमाल तिकीट दर दहा रुपयांत प्रवास करता येणार आहे. तर पुण्यदशम बससेवा पूर्ण दिवस मोफत असेल.
दि. 20 एप्रिल : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत महिला प्रवाशांना 10 रुपयांच्या दैनिक पासमध्ये संपूर्ण दिवस प्रवास करता येईल.