पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळासमोर आता गॅस पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सीएनजीची सुमारे 52 कोटी रुपयांची थकबाकी न दिल्यास गॅस पुरवठा थांबवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) दिला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या सुमारे बाराशेहून अधिक बसेस आहेत. यासाठी एमएनजीएलकडून गॅस पुरवठा करण्यात येतो. सध्या अत्यावश्यक सेवेतील बसेसना गॅस पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पीएमपीकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे.
सध्या प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्न घटले असल्याने पीएमपीचे चाक आर्थिक गर्तेत अडकले आहे. त्यातच गॅस पुरवठा थांबवण्याचा इशारा दिल्याने पीएमपी दुहेरी संकटात सापडली आहे. गॅस पुरवठ्याची थकबाकी लवकर देण्याबाबत एमएनजीएलकडून पीएमपी प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र अद्यापही ही रक्कम न दिल्याने, दिवसेंदिवस रकमेचे आकडे वाढत आहे. त्यामुळे बिले भरेपर्यंत सीएनजीचा पुरवठा थांबविण्याचा इशारा एमएनजीएलने दिला आहे.
अतिरिक्त निधीची गरज
करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याच्या अनुषंगाने खर्च भागवण्यासाठी आणि प्रलंबित देणी देण्यासाठी अतिरिक्त निधी पुणे पालिकेकडे 90.58 कोटी रुपये आणि पिंपरी चिंचवड पालिकेकडे 60.39 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे.
तर सन 2020-21 मध्ये अत्यावश्यक सेवेसाठी पुरवलेल्या बसेसचे भाडे आणि पालिकेकडे वर्ग केलेल्या सेवकांच्या वेतनासाठी झालेल्या खर्चाच्या रकमेपोटी पुणे पालिकेकडे 51.90 कोटी रुपये असे एकूण 142.48 कोटी रुपये आणि पिंपरी चिंचवड पालिकेकडे बसेसचे भाडे आणि वेतनाच्या रकमेपोटी 20.47 कोटी असे एकूण 80.86 कोटी रुपये अतिरिक्त निधी पीएमपीला मिळावा, अशी मागणी प्रशासनाने केली आहे. याबाबत पीएमपीकडून दोन्ही पालिकांना पत्र दिले आहे.
500 हून अधिक कोटी रुपयांची संचलन तूट
पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकांकडून एकूण संचलन तुटीपैकी अनुक्रमे 60 आणि 40 टक्के रक्कम टप्प्याटप्याने पीएमपीला देण्यात येते. यानुसार एकूण संचलन तूट 514 कोटी रुपये, त्यापैकी पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकने अनुक्रमे 308 आणि 205 कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. पुणे पालिकेकडून 20 कोटी रुपयांची संचलन तूट मिळाली आहे. मात्र पिंपरी चिंचवड पालिकेकडून एप्रिल महिन्याची संचलन तूट अद्याप मिळाली नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेकडून संचलन तूट देण्यात येते. पीएमपीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पालिकांकडून संचलन तुटीची रक्कम मिळाल्यास बिले देणे शक्य होणार आहे.
– डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल