वाल्हे -करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा घोळ आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणातील अंतर अचानक बदलल्याने आठ दिवसांपूर्वी लसीकरण केंद्रावर लागलेल्या रांगा गायब झाल्या असून लसीकरण केंद्रे ओस पडली आहेत.
ज्या कोणी 84 दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला आहे, याची शोधाशोध घेतली आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) आरोग्य केंद्रात मागील दोन दिवस 100 लस येऊनही नियमांच्या आडकाठीमुळे डोस कोणालाही देण्यात आलेला नाही, अशी माहिती आरोग्य सहायक तानाजी मेटकरी यांनी दिली.
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात चुकून काही ज्येष्ठ नागरिक पहिल्या डोसवेळी सांगण्यात आलेल्या 45 दिवसांच्या माहितीनुसार येत आहेत;
मात्र शासनाने आता ठरवून दिलेल्या नियमानुसार 84 दिवसानंतरच दुसरा डोस मिळत असल्याने या ज्येष्ठांना लसीकरणाशिवाय माघारी फिरावे लागत आहे.
दरम्यान, लॉकडाऊन जाहीर केला असल्याने सार्वजनिक वाहतूक बंदमुळे ज्येष्ठ नागरिकांची येण्या-जाण्याची हेळसांड होत असून भर उन्हात लसीकरणाविनाच घरी परतावे लागत आहे.
दुसऱ्या डोसला तांत्रिक अडथळा
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसांपासून करोना प्रतिबंधित लसीचा तुटवडा झाल्याने 44 वर्षांपुढील पुढील लसीकरणाचा पहिला डोस नागरिकांना मिळू शकला नाही;
मात्र वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि. 20) लसीच्या दुसऱ्या डोस करीत 120 लस उपलब्ध होऊनही नागरिक फिरकलेच नाहीत;
तरी शासनाकडून ठरवून दिलेल्या नियमानुसार, लसीकरणाचा दुसरा डोस देण्यास तांत्रिक अडथळा येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे यांनी सांगितले.
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. 10 मार्चपासून कोविड लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती. आजअखेर वाल्हे 5013 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे.
-राजेंद्र दळवी, पर्यवेक्षक, आरोग्य केंद्र, वाल्हे