बारामती तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त : चाऱ्याचा प्रश्न बिकट
माळेगाव – जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, शिरूर, पुरंदर तालुका वगळता सर्वत्र पाऊस आहे. बारामती तालुक्यात आतापर्यंत सरासरी 248 मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे. याच पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पशुधन जगवण्यासाठी मक्याचे पीक घेतले आहे. मात्र, या पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी, पशुपालक अडचणीत आले असून दुग्ध व पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
जनावरांच्या आहारासाठी प्रामुख्याने मक्याचे पीक घेतले जाते. तसेच डेअरी व पोल्ट्री व्यवसायात पशुखाद्यामध्ये कच्चा माल म्हणून मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गतवर्षीपासून बारामती परिसरात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याचे उत्पादन घटत असल्याने त्याचा थेट परिणाम दुग्ध व पोल्ट्री व्यवसायात दिसून येत आहे. शिवाय जनावरांसाठी लागणाऱ्या पशुखाद्याच्या दरामध्ये मागील काही दिवसांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. ऐन दुष्काळात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना अमेरिकन अळीच्या प्रादुर्भावामुळे चाऱ्याचे संकट पशुपालकांवर ओढवले आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे कृषितज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी म्हणाले की, मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात तसेच बारामती तालुक्यातही आढळून येत आहे. ही अळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. त्यामुळे मका उत्पादनात मोठी घट येत आहे. या अळीचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण करणे अवघड आहे; मात्र शेतकऱ्यांनी त्वरीत प्रतिबंधात्मक उपाय केल्यास अळीचा प्रादुर्भाव टाळात येऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.