पुणे –जिल्हा परिषदेने “जलजीवन मिशन’ अंतर्गत सर्वाधिक पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात पुणे जिल्हा परिषदेने एक लाख 38 हजार नळजोड देऊन राज्यात सर्वाधिक घरगुती नळ कनेक्शनमध्ये उच्चांक केला असून, त्यासाठी 66 कोटी रुपये खर्च केला आहे.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण क्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत 746 प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. संख्येच्या दृष्टीने 34 पैकी पुणे जिल्हा परिषद 10व्या क्रमांकावर आहे, तर डीपीआरमध्ये नवव्या क्रमांकावर असून तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या वर्क ऑर्डर देण्यामध्ये राज्यात पुणे जिल्हा परिषदा पाचवा क्रमांक आहे. गरिबांना घरकुल देण्याच्या गृहनिर्माण कार्यक्रमात, लाभार्थ्यांच्या मालकीची जमीन नसल्यामुळे 60 टक्के मंजुरी अडकली आहे. गायरान जमीन देण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या. त्यासाठी 109 तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार आहेत.
परंतु, जमिनीच्या कमतरतेमुळे तांत्रिक छाननीसाठी सादर करता येत नसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. “जलजीवन मिशन’ अंतर्गत कामगिरी सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेने 21 एजन्सी नेमल्या आहेत. त्यांच्याकडून 364 योजनांचे सर्वेक्षण आणि तपशीलवार प्रकल्प अहवाल केले जाणार आहेत, राज्य सरकारने मे अखेर शंभर टक्के तपशीलवार प्रकल्प अहवाल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.