पुणे – पालकांच्या शाळांविषयी असलेल्या विविध प्रकारच्या तक्रारींबाबत कार्यवाही करण्यासाठी आता दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर पालक सभा घेतली जाणार आहे. पालकांच्या आलेल्या तक्रारी आणि त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही याची माहिती अधिकाऱ्यांना सादर करावी लागणार आहे.
पुणे पेरेंट्स असोसिएशन या संघटनेच्या मागणीनुसार पालक सभा घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी पहिली बैठक आरसीएम गुजराती शाळेत झाली. यावेळी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्यासह पुणे पेरेंट्स असोसिएशनच्या जयश्री देशपांडे, योगेश पाठक, अतुल वाबळे, निखिल टिकार, कालिदास जाधव आदी उपस्थित होते.
शाळांकडून नियमांचे होणार उल्लंघन, अनधिकृत शाळांवर कारवाईस होणारी टाळाटाळ, शासन निर्णयानुसार शाळांनी न केलेली 15 टक्के शुल्क कपात आदी विषयांबाबत पालकांनी संताप व्यप्त करत शिक्षण विभागाला धारेवर धरले.
दरम्यान, औदुंबर उकिरडे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पालकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन नियमानुसार कार्यवाही करणे गरजेचे असून त्याबाबतचा अहवाल दर महिन्याला सादर करावा. हा अहवाल मंत्रीस्तरावर पाठविण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.