पुणे – राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा ( सीईटी) दि. 11 ते 13 जून रोजी 17 केंद्रांवर होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ मिळाली आहे.
कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्या शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. सीईटीतील गुणांवरूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी दि. 3 ते 28 मार्च असा आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. त्याचा विचार करून महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाने कालावधी 31 मार्चपर्यंत वाढविला आहे. तसेच ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्याची मुदत दि. 2 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.