पुणे – महापालिके संदर्भातील दाखले तसेच पैसे भरण्याच्या सुविधांसह इतर तक्रारींच्या निवारणासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्राच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर) नेमला जाणार आहे. नागरी सुविधा केंद्रांमधील गैरसोयी तसेच कारभारामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासबाबत दैनिक प्रभात ने “नागरी सुविधा नाही; “असुविधा’ केंद्र, असे वृत्त दिले होते. याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने सदर आदेश शुक्रवारी तातडीने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्याचे या विभागाचे प्रमुख राहूल जगताप यांनी सांगितले.
महापालिकेच्या वेगवेगळ्या 15 विभागांशी संबंधित सेवा या सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येतात. मात्र, गेल्या महिन्याभरापासून या केंद्रामध्ये नागरिकांना दाखल्यासह इतर सुविधा देताना टाळाटाळ तसेच उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनी “प्रभात’शी संपर्क साधत आपली व्यथा मांडली होती. याची दखल घेत या सुविधा केंद्राचा कारभार प्रभातने समोर आणला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने या केंद्रावर समन्वयक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत ही केंद्र क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली काम करत होती. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याला त्यावर लक्ष ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे आता या केंद्राच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी असणार आहे. हा अधिकारी या 15 विभागांशी समन्वय ठेवणार असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जागेवर सोडविल्या जाणार आहेत. या केंद्राच्या ठिकाणी तक्रार पेटीही ठेवण्यात येणार असून नागरिकांना थेट तक्रारही करता येणार आहे.