पुणे – ओंकारेश्वर मंदिर परिसरात वाळलेले झाड डोक्यावर पडून युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने तत्कालीन वृक्ष निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हे झाड धोकादायक असल्याची तक्रार पीएमसी केअर या तक्रार निवारण प्रणालीवर करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हे झाड काढले गेले नसल्याचे घटनेनंतर समोर आले. त्यानंतर या प्रकरणी संबंधित वृक्ष निरीक्षकास नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या.
त्यावर सहायक उद्यान अधीक्षक श्रृती नाझीरकर यांनी अतिरिक्त आयुक्त ढाकणे य़ांना अहवाल सादर केला आहे. दरम्यान, या अहवालाची तपासणी करून या प्रकरणी दोषी असणार्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
आयुक्त म्हणाले, हा प्रकार गंभीर आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्याची सोडवणूक करणे संबंधित विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या.
तक्रारी गांभीर्याने घ्या
सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी धोकादायक झाडांबाबतच्या तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने संबंधित ठिकाणी पाहणी करून तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच असे प्रकार घडणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.