पुणे -शहरात पर्यावरण संवर्धन तसेच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून ई-वाहनांना चालना देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नव्याने ई-रिक्षा घेणाऱ्या रिक्षाधारकांना महापालिका आता 25 हजारांचे अनुदान देणार आहे. ही माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेल्या रिक्षाधारकांनाच हे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी 2023-24 च्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद प्रस्तावित करण्यात येणार आहे. शहरातील वायू प्रदूषण कमी होण्यासाठी यापूर्वी सीएनजी रिक्षांना 12 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते.
मात्र, 2018 मध्ये शहरात जवळपास सर्व रिक्षा सीएनजी झाल्याने तसेच शासनाकडूनच नवीन रिक्षा सीएनजीच्याच असण्याचे धोरण आणण्यात आल्याने महापालिकेने हे अनुदान बंद करण्यात आले होते. या अनुदानाचे काम महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून पाहिले जात होते. आता केंद्रशासन तसेच राज्यशासन प्रदूषण कमी करण्यासाठी ई-वाहनांना प्रोत्साहन देत असल्याने ई- वाहनांना अनुदान दिले जात आहे.
तर रिक्षा बाजारात ई- रिक्षादेखील आलेल्या असून त्यांच्या वापरास प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मान्यता दिलेली आहे. मात्र नवीन ई- रिक्षाची किंमत जास्त आहे. त्यामुळे रिक्षाधारकांना ती परवडत नाही. अशा स्थितीत या अनुदानाचा रिक्षाधारकांना फायदा होणार आहे. मात्र, हे अनुदान केवळ नवीन रिक्षांसाठी असणार आहे. दरम्यान, शहरात जवळपास 85 हजार रिक्षा असून सध्या त्या सर्व सीएनजीवर आहेत.