Nanded City – “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर…” असा जयघोष आणि नांदेड सिटी (Nanded City) , सिटीझन ढोल पथक, सिक्युरिटी ढोल पथक व मैत्रीण लेझीम पथक यांच्या दमदार व जानदार वादनाने नांदेड सिटी येथे गणेश विसर्जन (Ganesha Visarjan) मिरवणुकी संपन्न झाली.
या मिरवणुकी दरम्यान रहिवाशांची एकजूट दिसून आली. येथील रहिवाशांनी दाखून दिले की, ही एक सिटी नसून नांदेड सिटी परिवार आहे. मिरवणुकीमध्ये नांदेड सिटी ढोल पथक, मैत्रीण लेझीम पथक आणि सेक्युरिटी ढोल पथक यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले.
“एक सिटी एक गणपती” आणि ‘एकच मिरवणूक’ हे नांदेड सिटी मध्ये बघायला मिळते. मिरवणुकीच्या वेळी नागरिकांनी दाखवलेली शिस्त, वाहतुकीतील नियोजन, मिरवणूकीतील वेळेचे नियोजन हे इतरांनी आदर्श घेण्यासारखे आहे.
नांदेड सिटी ढोल पथकामध्ये एकूण १२७ जणांचा सहभाग होता आणि त्याचे नेतृत्व नितीन देशमुख, किशन केसलीवाल, किशोर जावळे, प्रशांत कोमकुल आणि साहिल परदेशी, जयश्री जावळे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पडले.
वादनाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मिताली निचळ आणि आनंद शाह या तरुण प्रशिक्षकांनी लिलया पेलली. या पथकामध्ये ढोल ताशा बरोबरच ध्वज आणि झांज यांचा पण समावेश होता. यामध्ये लहान मुलांना एकत्र आणून पुढची पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न व्यवस्थापन समितीकडून केला जात आहे.
त्यासाठी विशेष कौतुक करावे लागेल. या ढोल पथकामध्ये ६० % महिलांचा सहभाग होता, तसेच यामध्ये असणारे सर्व वादक हे डॉक्टर, इंजीनियर, वकील आणि विद्यार्थी आहेत. सर्वांनी आपले काम आणि अभ्यास संभाळून हे पथक उभारले आहे.
मैत्रीण लेझीम पथकामध्ये तब्बल ५० महिलांचा सहभाग होता आणि त्याचे नेतृत्व कमल जाधव यांनी केले. तसेच सेक्युरिटी ढोल पथकात नांदेड सिटीमध्ये काम करणाऱ्या सेक्युरिटी गार्ड्सचा सहभाग होता आणि त्याचे नेतृत्व सेक्युरिटी प्रमुख जाधव यांनी केले.
या सगळ्या मिरवणुकीदरम्यान नांदेड सिटी रहिवाशाच्या एकोप्याचे दर्शन झाले. गणेश उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नांदेड सिटी पी.एम.एस आणि नांदेड सिटी कल्चरल कमिटी यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.