पुणे -सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची (एसटीची) यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी झाली. मागील पंधरा दिवसात एसटीला तब्बल 328 कोटी 40 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर राज्यात पुणे विभागाने सर्वाधिक उत्पन्न 21 कोटी 44 लाख रुपये मिळवत पहिल्या स्थानावर बाजी मारली आहे.
शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात आलेले विद्यार्थी आणि नागरिक कुटुंबासह दिवाळीला गावी जातात. त्यावेळी कमी खर्च, सुरक्षित आणि थेट घरापर्यंत प्रवास देणाऱ्या एसटीला अधिक पसंती असते. त्यामुळे दिवाळीच्या पंधरा दिवस आधीपासून लांबपल्ल्याच्या बसेसचे आरक्षण फुल्ल होते.
त्यामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या विभागाअंतर्गत राज्यभरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा बसेस नियोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, एसटीच्या बसची संख्या कमी, चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी असतानाही प्रवाशांना सेवा देण्यात आली.
प्रादेशिक विभागानुसार उत्पन्न (रुपयांत)
पुणे – 81 कोटी 61 लाख
छ. संभाजीनगर- 68 कोटी 49 लाख.
नाशिक- 63 कोटी 32 लाख
मुंबई- 55 कोटी 2 लाख,
अमरावती- 32 कोटी 22 लाख
नागपूर- 27 कोटी 71 लाख या प्रमाणे उत्पन्न मिळाले.