पुणे – कमला नेहरू रुणालयातील डायलिसिस सेंटर बंद ठेवल्याप्रकरणी लायन्स क्लबला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सेंटरमधील 12 डायलिसिस मशिनपैकी 10 बंद आहेत. केवळ दोन मशीन सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेने लायन्स क्लबला नोटीस बजावली आहे.
कमला नेहरू रुग्णालयात 12 डायलिसिस मशीन आहेत. लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सेंटर चालवले जात आहे. सेंटरमधील 10 मशीन बंद अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी विलंब होत होता. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने 20 जून रोजी लायन्स क्लबला नोटीस पाठवली. त्यानंतर केवळ तीन मशीन कार्यान्वित करण्यात आली. उर्वरित मशीन 15 दिवसांमध्ये सुरू न केल्यास करार रद्द केला जाणार आहे.
“पालिकेने पैसेच दिले नाहीत’
दरम्यान, “आम्ही एका महिन्यात 450 हून अधिक डायलिसिस करू शकतो. कोविडनंतर गेल्या दोन वर्षांपासून ही संख्या 350 च्या पुढे गेलेली नाही. सध्या 15 पैकी सहा मशीन कार्यरत आहेत. काही मशीन्ससाठी आम्ही स्पेअर पार्ट्सची वाट पाहत आहोत. उत्पादकांना स्पेअर पार्ट्स वितरीत करता न आल्याने समस्या निर्माण झाली आहे. तसेच, पालिकेकडून उशीर झालेल्या पेमेंटमुळे केंद्राला फटका बसला आहे. आम्ही शुल्कासाठी महापालिकेवर अवलंबून असल्याने रुग्णांकडून एक रुपयाही घेत नाही.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेले पेमेंट फक्त दोन आठवड्यांपूर्वी करण्यात आले आहे. आमचा करार रद्द करण्याची गरज नाही. कारण, तीन मशीन वगळता सर्व पायाभूत सुविधा पूर्णपणे लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या मालकीच्या आहेत,’ असे लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामदास पन्हाळे यांनी म्हटले आहे.