पुणे – शहरातील वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरातील बांधकामे, मेट्रो तसेच महापालिकेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची नियमावली महापालिका आयुक्तांनी जाहीर केली आहे. मात्र, आयुक्तांच्या नियमावलीला महापालिकेच्या प्रकल्प विभागानेच हरताळ फासला असून सिंहगड रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही उपाय न करता रस्ता खोदण्यात येत असून मोठ्या प्रमाणात वर्दळीच्या रस्त्यावर धूळ उडत आहे.
विशेष म्हणजे आयुक्तांचे आदेश महापालिकेच्या सर्वच विभागांना असताना प्रकल्प विभाग मात्र, महापालिकेला हे नियम नाहीत, असे सांगत या प्रकरणी ठेकेदारांना पाठीशी घालत आहे. दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी प्रकल्प विभागास सूचना देत संबधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकार ?
महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. या पुलाचा रॅम्प करण्याचे काम धायरीच्या दिशेने सुरू आहे. त्यासाठी, महापालिकेच्या राजाराम पूल चौकातील एसटीच्या समोरील बाजूस जुना काॅंक्रीटचा रस्ता खोदण्यात येत आहे. हा रस्ता पोकलोन लावून खोदण्यात येत आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वर्दळीच्या रस्त्यावर धूळ उडत आहे. प्रत्यक्षात आयुक्तांच्या आदेशानुसार, ज्या ठिकाणी बांधकामे तसेच विकासकामांचे प्रकल्प सुरू आहेत.
त्या ठिकाणी २५ फूट उंचीचे पत्रे, तसेच धूळ रोखण्यासाठी पाण्याने भिजविलेल्या ज्यूट जाळया लावणे, धूळ उडत असल्यास त्यावर पाण्याची फवारणी करणे, अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच त्याची अंमलबजावणी न झाल्यास थेट काम थांबविणे, असे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, हे आदेश महापालिकेला लागू नसल्यासारखे काम शहरात सुरू असून पालिकेच्या प्रकल्पांच्या ठिकाणीच या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे.
५०० पेक्षा अधिक बांधकामांना नोटीस
महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर बांधकाम विभागाकडून २२ नोव्हेंबरपासून गेल्या दोन आठवड्यात सुमारे ५४७ बांधकामांना धूळ रोखण्यासाठी उपाय योजना करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, व्यावसायिकांकडून महापालिकेस हमी देत सामाजिक भान जपत आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले जात आहे. मात्र, त्याच वेळी ज्या महापालिकेकडून स्वत: पासून प्रदूषण नियंत्रणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तीच महापालिका मात्र, याकडे सोयीस्कर दूर्लक्ष करत आहे.