अनधिकृत नळजोडांना पुणे पालिकेचे अभय

पाणीकपातीचे संकट घोंगावत असतानाही प्रभावी कारवाई नाही

पुणे – पाणीकपातीचे संकट शहरावर घोंगावत असताना अनधिकृत नळजोडांवरील कारवाई महापालिकेने अद्यापही प्रभावी केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्रास, चोवीस तास, बिनधास्त या पाण्याचा वापर अनधिकृतपणे केला जात आहे. एवढेच नव्हे तर महापालिकेच्या पाईपलाईनमधून टॅब काढून पाण्याची दिवसाढवळ्या चोरी केली जात आहे.

नुकतीच जनता वसाहतमध्ये झोपडपट्टीमध्ये पाण्याची लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर येऊन हा भाग जलमय झाला होता. त्यावेळी पाण्याच्या लाईनवरच झोपड्या बांधण्यात आल्या असून, या मुख्य पाईपलाईनमधून टॅबच्या सहाय्याने पाणी चोरी होत असल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार सर्रास मध्यवस्तीत आणि उपनगरांमध्येही होत असून, त्यावर महापालिकेला कोणत्याही प्रकारे अंकुश ठेवता आला नाही.

सद्यस्थितीत धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यामध्ये जुलैपर्यंत पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे आहे ते पाणी काटकसरीने वापरणे आवश्‍यक असल्याचे महापालिकेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. असे असतानाही या प्रकारे पाण्याची चोरी होत असल्याचे दिसून येत आहे.

नरवीर तानाजी वाडी येथे एक बांधकाम सुरू आहे. तेथे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या पंपावर मोटर लावून ते पाणी अक्षरश: वीजेच्या तारांप्रमाणे पाईप लावून बांधकामासाठी खेचून घेण्याचा पराक्रम एकाने केला आहे.

मतांसाठी राजकीय दबाव
अनधिकृत नळजोड, पाणी खेचून घेणारे मोटर या सगळ्या गोष्टींवर महापालिकेकडून कारवाईला सुरुवात केली होती. सुमारे लाखांच्या घरात अनधिकृत नळजोड असताना या कारवाईला गती नसल्याने ती शेकड्यातच करण्यात आली आहे. या पाणीचोरीवर अंकुश कसा बसवणार हा अत्यंत मोठा प्रश्‍न महापालिकेपुढे आहे. परंतु, मतांसाठी राजकीय दबाव असल्यानेही हे काम होत नसल्याचेही वारंवार दिसून आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.