श्रीरंग बारणेंच्या निकालावर भेगडे, जगतापांचे पालकमंत्रिपद?

पिंपरी  – लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच पुण्याचा पालकमंत्री कोण? असा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता असली तरी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निकालानंतरच या प्रश्‍नाचे उत्तर मिळणार आहे. गिरीश बापट विजयी होऊन दिल्लीला गेल्यास त्यांच्या जागी आमदार लक्ष्मण जगताप किंवा बाळा भेगडे यापैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्‍यता अधिक आहे. मात्र, या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या निकालावरच अवलंबून असल्याने या विषयाची चर्चा पिंपरी-चिंचवडसह मावळमध्ये रंगली आहे.

पुण्याचे पालकमंत्री म्हणून सध्या गिरीश बापट हे कार्यरत आहेत. बापट यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळाल्याने तसेच ते जिंकून येण्याची अधिक शक्‍यता असल्याने सध्या पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा रंगली आहे. पुणे जिल्ह्यातून भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि बाळा भेगडे यांना गेल्या साडेचार वर्षांत मंत्रीपदाने हुलकाणी दिली असली तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या दोघांवर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली होती. येत्या 23 तारखेला लोकसभेचा निकाला लागणार असून त्यावेळीच या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार की अन्य कोण? या प्रश्‍नाचे उत्तर मिळणार आहे. सुरुवातीच्या काळात बारणे यांच्या उमेदवारीला लक्ष्मण जगताप यांनी तीव्र विरोध केला होता मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी दोघांमधील वाद संपुष्टात आणण्यात युतीच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले होते.

चिंचवड मतदारसंघात सध्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून बारणे यांना किती मताधिक्‍य मिळते यावरच लक्ष्मण जगताप यांचे बरेचशे भवितव्य अवलंबून आहे. तर गेल्या साडेचार वर्षांत सातत्याने मंत्रीपदाची हुलकावणी मिळालेल्या भेगडे यांनाही मंत्रीपदाची संधी आहे. श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांना तगडी लढत दिली असून दोघांमध्ये झालेल्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.

विजयी कोण होणार यावर अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. चिंचवड आणि मावळ मतदारसंघातील मताधिक्‍य हाच कळीचा मुद्दा राहणार असला तरी बारणे यांचा विजयदेखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. बारणे पराभूत झाल्यास बाळा भेगडे यांच्या अडचणी वाढणार नसल्या तरी मंत्रीपदाची संधी मिळण्याची खात्री नाही. भाजपच्या पातळीवर जगताप यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. तर मुख्यमंत्री या दोघांना डावलून भाजपातील दुसऱ्याच एखाद्या वरिष्ठ मंत्र्याकडे पुण्याची जबाबदारी देण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जगतापांची भाजपामधील वाटचाल आणि भेगडे यांचे मंत्रीपद या बाबी निकालावरच अवलंबून असल्याची चर्चा रंगली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.