पुणे – सहा महिन्यांत सुमारे 37 लाख 90 हजार 27 डोस देण्यात आले असून, त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा समावेश आहे. असे असले, तरी संपूर्ण राज्यात पुणे महापालिकेच्या हद्दीत लसीकरणाचा वेग सर्वाधिक असून, लसीकरणाबाबत महापालिकेचा क्रमांक एक आहे.
दि. 1 मे पासून 18 च्या पुढील वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये कोविशिल्डचे 18 लाख 35 हजार 935 तर कोवॅक्सिनचे 1 लाख 86 हजार 397 डोस देण्यात आले. याशिवाय खासगी रुग्णालयात कोविशील्डचे 16 लाख 56 हजार 817 तर कोवॅक्सिनचे 70 हजार 41 डोस देण्यात आले.
या दोन्ही लसींबरोबरच खासगी रुग्णलयात स्फुटनिक लसही देण्यात आली असून, 40 हजार 837 जणांनी या लसीचे डोस घेतले आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्फुटनिक लसींचे मिळून 37 लाख 90 हजार 027 डोस देण्यात आले आहेत.
अद्यापही सव्वालाख लोकांचा पहिला डोस राहिला असून, त्यांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. रोजच्या लसीकरणाच्या नियोजनात लसींच्या कोट्यातील 10 टक्के लस ही पहिल्यांदा लस घेणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अद्याप कमी असून, त्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. त्यासाठी रोजच्या नियोजनात 90 टक्के कोटा ठेवण्यात आल्याचे महापालिकेच्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.