पुणे –महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना करोनाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत करोनाच्या 30 हजारांहून अधिक रुग्णांवर 71 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये ससून रुग्णालयात सर्वाधिक उपचार झाले आहेत.
राज्यातील सर्व रेशनकार्ड धारक हे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत. पुण्यात असे 71 रुग्णालये आहेत. यामध्ये 996 प्रकारचे उपचार या योजनेतील रुग्णालयांमध्ये मोफत होतात. यापैकी 52 खाजगी तर 19 रुग्णालये ही सरकारची आहेत. पुणे महापालिकेत या योजनेअंतर्गत एकूण 22 रुग्णालये आहेत. यामध्ये 8 सरकारी आणि 13 खाजगी रुग्णालयाचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेत योजनेअंतर्गत 7 रुग्णालये आहेत. यामध्ये 2 सरकारी आणि 5 खाजगी रुग्णालयाचा समावेश आहे.
ग्रामीण भागामध्ये योजने अंतर्गत 42 रुग्णालये आहेत. यामध्ये 9 सरकारी आणि 33 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. सद्यस्थितीत एकूण 71 अंगीकृत रुग्णालयांपैकी 45 रुग्णालये कोविड मध्ये काम करत आहेत. त्यापैकी 14 रुग्णालये सरकारी तर 31 रुग्णालये खासगी आहेत आणि उरलेले 26 रुग्णालये नॉन कोविड काम करत आहेत. सध्या योजनेअंतर्गत 30 हजार 828 कोविड रुग्णांवर उपचार झाले असून, त्यासाठी 70 कोटी 74 लाख 50 हजार 770 रुपये योजनेमार्फत मंजूर करण्यात आले आहेत.
ससूनसह पाच रुग्णालयांत सर्वाधिक उपचार
ससून रुग्णालयांत सर्वाधिक उपचार झाले असून, त्याची संख्या 6 हजार 220 आहे. त्यापाठोपाठ काशीबाई नवले रुग्णालयात 2 हजार 660, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात 2 हजार 586, भारती हॉस्पिटल मध्ये 2 हजार 543, बाणेर जंबो कोविड रुग्णालयांत 2 हजार 105 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.