पुणे (प्रतिनिधी)- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता राज्यात सर्वत्र दिसू लागला आहे.संध्याकाळनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळ पासून वादळी पावसाला सुरूवात झाली.
पुणे शहरात गेले दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत होते अधूनमधून पावसाच्या सरी सुद्धा कोसळत होत्या पण मुसळधार पावसाला सुरवात झाली नव्हती. संध्याकाळनंतर मात्र पावसाचा जोर आणखी वाढला. या पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते तर रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. शहरात अनेक भागात सध्या पावसाळी कामे सुरू आहेत त्यातच आता पावसाला सुरूवात झाल्याने अनेक भागात चिखल जमा झाला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.पावसाचा जोर उद्यापासून (बुधवार) जास्त वाढणार आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर आज त्याने आणखी प्रगती करत केरळ मधील इतर काही भाग व्यापला. चक्री-वादळाच्या प्रणालीमुळे मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढला असून हा वेग असाच राहीला तर महाराष्ट्रात सुद्धा येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होऊ शकतो असे ही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.