पुणे –“गेल्या आठ दिवसांत आढळलेल्या करोना बाधितांपैकी सुमारे 75 टक्के जणांनी करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यामुळे या रुग्णांत सौम्य लक्षणे आहेत. सध्या सक्रिय रुग्णसंख्या जरी वाढली असली, तरी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागण्याचे प्रमाणही कमी आहे. करोनाचे संकट गंभीर झाले, तर महापालिकेची आरोग्य यंत्रणा त्याला तोंड देण्यास सज्ज आहे,’ असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी स्पष्ट केले.
शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत महापौर मोहोळ यांनी करोनाची शहरातील सद्यःस्थिती स्पष्ट केली. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते. महापौर म्हणाले, “शहरात ओमायक्रॉनचे 47 रुग्ण आढळून आले असून, त्यांच्यामध्येही सौम्य लक्षणे आहेत. करोना बाधितांच्या तुलनेत ओमायक्रॉन बाधितांत कमी लक्षणे दिसून आली आहेत. सध्या 300 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणा सज्ज
महापालिकेकडे मुबलक औषधसाठा आहे. सुमारे 4 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन, आयसीयू – व्हेंटिलेटर- ऑक्सिजन आणि साधे असे एकूण अठराशे बेड, प्रतिमिनीट साडेनऊ हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लॅंट तयार आहेत. तसेच 130 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा करण्याची क्षमता आहे. हडपसर, वारजे, येरवडा येथील आणखी तीन रुग्णालये दाखल झाली आहेत. जम्बो रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरही सुरू करण्याचे नियोजन झाले आहे, असे महापौरांनी सांगितले.
शहरात करोना रुग्णसंख्या वाढत असली, तरी सध्या नव्याने निर्बंध लागू केले नाहीत. आहे त्याच निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथके नेमली जातील.
– मुरलीधर मोहोळ, महापौर