पुणे : मांजरीच्या माजी सरपंचांवार गैरसमजातून गोळीबार करून डोक्यात दगड घालण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात नंदू शेडगे, चंद्रकांत घुले, व अन्य तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर हे हॉटेल श्रीराम येथे आपल्या मित्रांसह जेवण करायला गेले होते. त्यावेळी चंद्रकांत घुले यासोबत त्याच टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे भांडण झाले. मात्र या भांडणाचा आणि धारवाडकर यांचा काही संबंध नव्हता भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण मोपेडवरुन तेथे आले. त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. ती धारवाडकर यांना लागली नाही. त्यानंतर त्यांनी तेथे पडलेल्या दगड, विटांनी धारवाडकर यांना मारहाण केली. दगड डोक्यात घातल्याने त्यात ते जबर जखमी झाले. जखमी धारवाडकर यांना उपचारासाठी तात्काळ नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.