पिंपरी, (प्रतिनिधी) – शासनाने जाहिर केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला १४८ नवीन शिक्षक भेटणार आहेत. महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने रिक्त पदांची यादी शासनाच्या पवित्र पोर्टलवर अपलोड केली होती. त्यानुसार या जागेवर पद भरती केली जाणार आहे. शिक्षक भरती झाल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षकांअभावी होणारी गैरसोय टळणार आहे.
राज्य शासनाने नुकतीच मोठी शिक्षक भरती करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षण भरती झाली नाही. शिक्षक भरतीच्या प्रतिक्षे होते. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. थेट सरकारी नोकरी आणि शिक्षक होण्याचे स्वप्न आता अनेकांचे पूर्ण होणार आहे. शिक्षक भरती प्रक्रियेतून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा आणि शाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरली केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सध्या शिक्षकांची संख्या अपुरी आहे. यामध्ये काही शिक्षकांना सर्वेसह इतर अतिरिक्त कामे दिली जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या शिकवणुकीवर त्याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारी आता संपणार आहेत. माध्यमिक विभागासाठी १४८ नवीन कायमस्वरूपी शिक्षक भेटण्याचा मार्ग नवीन शिक्षक भरतीमुळे मोकळा झाला आहे.
आरक्षणनिहाय रिक्त पदांची संख्या –
रिक्त पदांच्या भरतीमध्ये महिला, माजी सैनिक, अंशकालिन, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, खेळाडू, उर्वरीत असे आरक्षण निहास रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदांची यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महिलांसाठी ४४, माजी सैनिक २१, अंशकालिन १४, प्रकल्पग्रस्त ६, भुकंपग्रसत २, खेळाडू ६, उर्वरीत ५५ अशा एकूण १४८ शिक्षकांची भरती केली जाणार आहे.