गणेश आंग्रे
पुणे – भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी ही संगणक प्रणाली अद्ययावत केली असून आता ई-मोजणी 2.0 ही नवीन प्रणाली आणली आहे. यामध्ये जमीनधारक स्वत:च मोजणीसाठी अॉनलाइन पध्दतीने अर्ज भरू शकतात. तसेच मोजणी फी सुध्दा अॉनलाइन भरण्याची सुविधा आहे. याचसह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळणार आहे. याचसह जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत सुध्दा अॉनलाइन मिळणार असून त्यासाठी नागरिकांना मोजणी कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच मोजणीच्या नकाशावर अक्षांश-रेखांक्ष (कोर्डिनेट्स) दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना जमिनीचे लोकेशन सुध्दा कळणार आहे.
भूमि अभिलेख विभाग सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अॉनलाइन सुविधा देण्यास प्राधान्य देत आहे. सातबारा संगणकीकरण, ई-फेरफार, ई-हक्क याद्वारे नागरिकांना घरसबल्या सुविधा देत आहे. अॉनलाइन सातबारा उताऱ्या पाठोपाठ आता भूमि अभिलेख विभागाने मोजणीची प्रकि्रयासुध्दा सोपी आणि सुटसुटीत करण्याचे काम हाती घेतले आहे. याद्वारे नागरिकांना जमीन मोजणीचा नकाशा अर्थात क-प्रत सुध्दा आॅनलाइन देण्याचे काम हाती घेतले आहे.
राज्यात दरवर्षी काही हजार मोजणीचे अर्ज दाखल होतात. अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित अर्जदाराच्या जमिनींची मोजणी करताना त्या जागेचे अक्षांश- रेखांश देखील निश्चित करण्यात येणार आहे. ते जमिनींच्या भूआधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. तसेच या अक्षांश-रेखांश यांची माहिती ‘क्र-प्रत’वर देण्यात येणार आहे. जेणे करून ‘क प्रत’वरील क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर घरबसल्या संबंधित जमिनींचे लोकेशन पाहता येणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करून त्या ठिकाणी ‘ई मोजणी व्हर्जन २’ ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
त्यानुसार पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याची निवड करून त्याठिकाणी प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरु आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आली. मोजणी अर्ज दाखल झाल्यानंतर मोजणी करताना संबंधित जमिनींचे कोर्डिनेट्स निश्चित करावेत, अशा सूचना भुकर मापकांना भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जमीन खरेदी करताना दाखविली एक आणि दिली दुसरी, असे प्रकार जे होतात. त्यांना आळा बसणार आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू करण्यात येणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.
ई मोजणीची वैशिष्टे
-अॉनलाइन जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार
-अॉनलाइन मोजणी फी भरण्याची सुविधा
– अर्जाची सद्यस्थिती एमएमएसने कळणार
– जमीन मोजणी प्रत अॉनलाइन मिळणार
– मोजणीच्या नकाशावर अक्षांश-रेखांक्ष’ असणार