पुणे – शहरात सुरक्षित वाहतुकीसाठी महापालिकेने मोठ्या रस्त्यांवर दुभाजक टाकले आहेत. मात्र, व्यवसायावर परिणाम होत आहे; शिवाय वाहनांना मोठा वळसा घालावा लागत असल्याचे सांगत हे दुभाजक तोडले जात आहेत. याच “शॉर्टकट’मधून रस्ता ओलांडला जात आहे. हेच कृत्य जीवावर बेतत असून, अपघातांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
शहरात तुलनेत यंदा अपघातांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यात प्रामुख्याने तुटक्या दुभाजकांनी असे अपघात होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने असे तुटलेले दुभाजक तातडीने बंद करावेत, असे पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले आहे.
रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्यशासन तसेच महापालिकेसह इतर यंत्रणाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तरी शहरात अपघातांची संख्या वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीदेखील नेमण्यात आली आहे. या समितीच्या सूचनांनुसार आरटीओने मनपा हद्दीतील अपघातप्रवण क्षेत्रांची तपासणी नुकतीच केली. त्यातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.
दुभाजक तोडणाऱ्यांवर कारवाई कधी
शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर दुभाजक अनधिकृतरित्या तोडण्यात आले आहेत. तर रस्त्यांकडेचे हॉटेलचालक, वाहन शोरूमचालक, मोठे दुकानदार, खासगी कार्यालयासह, लहान-मोठे दुकानदार स्थानिक लोकप्रतिनिधींचा वरदहस्ताने दुभाजक तोडत आहे. अशा प्रकारे मालमत्तेचे नुकसान केल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत एकदाही अशी कारवाई झालेली नाही.
तीन वर्षांतील शहरातील अपघात (आकडे दि. 16 ऑगस्टपर्यंत)
वर्ष एकूण अपघात प्राणांतिक अपघात
2021 741 239
2022 872 315
2023 742 208