पुणेकरांनो, शहर स्वच्छ ठेवा अन्‌ बक्षीस मिळवा

24 लाख रुपयांचे “स्वच्छ’ पुरस्कार : पालिकेने कसली कंबर

पुणे -केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाही महापालिकेने यावर्षी कंबर कसली असून, नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून 24 लाख रुपयांचे स्वच्छ पुरस्कार देण्यात येणार आहेत, महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक आणि उपायुक्त माधव जगताप उपस्थित होते.

स्वच्छ भारत आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी, केंद्र सरकारकडून “स्वच्छ’ स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत नागरिकांनी सहभाग घेऊन शहर स्वच्छतेसाठी हातभार लावावा, यासाठी महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांपासून “स्वच्छ’ पुरस्कार देण्याला सुरूवात केली आहे.

यावर्षीही 24 लाख रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. नागरिकांसाठी बारा वेगवेगळ्या गटांसाठी 11 लाख 32 हजार रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत. याशिवाय महापालिका कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 16 गटांत ही स्पर्धा असून, त्यासाठी वेगवेगळ्या विभागांसाठी 12 लाख 69 हजार रुपयांची बक्षीसेही दिली जाणार आहेत. हे स्पर्धा 16 सप्टेंबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे. स्पर्धेसाठी एक व्यक्ती अथवा संस्था एकच प्रवेशिका पाठवू शकणार आहे. प्रवेशिकेसमवेत स्वच्छता उपक्रमाची छायाचित्रे जोडणे बंधनकारक आहे.
अशी असतील बक्षिसे

स्वच्छ स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट व्हिडिओ यासाठी एक लाख रुपयांचे तर जिंगलसाठी 50 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. “सेल्फी विथ सफाई सेवक’ अथवा स्पॉटसाठी 10 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट घोषवाक्‍यासाठीही 10 हजार रुपयांचे बक्षीस आहे. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रकला, स्वच्छ कुटुंब, स्वच्छ सोसायट/गृहनिर्माण, शाळा महाविद्यालये, खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आणि रुग्णालय या प्रत्येक वर्गासाठी 21 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)