सातारा पालिकेतील तेरा शिक्षिकांची ठेकेदाराकडून लाखोंची फसवणूक

भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम परस्पर लाटल्याचा आरोप

सातारा – सातारा पालिका शिक्षण मंडळाच्या सेमी इंग्लिश, प्ले ग्रुपच्या शिक्षिका व मदतनीसांची भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम ठेकेदाराने 2014 पासून भरली नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. शिक्षिकांना आपल्याच हक्‍काच्या रकमेसाठी टाचा घासण्याची वेळ आली असून शिक्षण मंडळ आणि पालिकेचे पदाधिकारी दाद देत नसल्याचे या शिक्षिकांनी सांगितले.

आधी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व नंतर गरूडझेप नावाने नोंदणीकृत असणाऱ्या संस्थांनी सेमी इंग्लिशच्या पाच, प्ले ग्रुपच्या चार शिक्षिका व चार महिला मदतनीसांच्या वेतनातून प्रत्येकी दीड हजार रुपये दरमहा भविष्य निर्वाह निधीपोटी कापून घेतले. ही कपात 2014 पासून सुरू होती. सावरकर संस्थेची निविदा संपल्यानंतर ही निविदा गरूडझेप ठेकेदार संस्थेकडून भरण्यात आली. ही संस्था नगराध्यक्षांच्या भाच्याची असल्याची माहिती आहे. त्या संस्थेनेही गेल्या दोन वर्षांत पीएफ भरला नसल्याची माहिती या शिक्षिकांना मिळाली. त्या मंगळवारी या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेल्या असता कोणीच त्यांना दाद दिली नाही. महिला मोर्चाच्या भीतीने शिक्षण मंडळाचे लिपिक आधीच गायब झाले होते. प्रशासनाधिकारी मारूती भांगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, त्यांनी पालिका प्रशासनाकडे बोट दाखवले.

पालिका शिक्षण मंडळांची नामुष्की म्हणजे जोशात सुरू करण्यात आलेला प्ले ग्रुप बंद करण्यात आला. त्यातील एका शिक्षिकेने सेवासमाप्तीनंतर 2013-17 या चार वर्षांची भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम काढली, तेव्हा ती केवळ पाच हजार रुपये होती. त्यामुळेच पीएफ लाटालाटीचे हे प्रकरण उघडकीस आले, अशी चर्चा आहे. संबंधित ठेकेदार संस्था नगराध्यक्षांच्या नातेवाइकाची असून तो मोबाईल बंद करून गायब होत आहे. त्यामुळे नगराध्यक्षांची अडचण वाढल्याची चर्चा पालिकेत आहे. या फसवणुकीच्या विरोधात शिक्षिकांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)