पुणे – जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये पुणे सहाव्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. याबाबत “टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स’ या डच कंपनीने अहवालानुसार जगासमोर मांडला आहे.
तर, पुण्याप्रमाणे आयटी सिटी अशी ओळख असलेले बंगळुरू शहर या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे. पुण्यात प्रति 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी 27 मिनिटे 20 सेकंद लागत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
“टॉम-टॉम’ संस्थेने जगातील 56 देशांत 389 मोठ्या शहरांतील ट्रॅफिकची माहिती संकलन करून “ट्रॅफिक इंडेक्स 2022′ हा अहवाल मांडला आहे. दरम्यान, बंगळुरू येथे 10 किलोमीटर अंतरासाठी 29 मिनिटे लागत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. येथे वाहनांचा सरासरी वेग ताशी 18 किलोमीटर आहे, तर पुण्यातही तशीच स्थिती असल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, या संस्थेच्या सर्व्हेनुसार लंडन हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर ठरले असून, राजधानी दिल्ली 34व्या, तर मुंबई 47 व्या क्रमांकावर आहे. लंडन येथे 10 कि.मी. अंतरासाठी सरासरी 36 मिनिटे लागतात. तेथे वाहतुकीचा सरासरी वेग 14 किलोमीटर आहे. यासोबतच डब्लिन- आयर्लंड, सपोरो- जपान, मिलान- इटली, बुखारेस्ट- रोमानिया, लिमा- पेरू, मनिला- फिलीपिन्स आणि बोगोटा- कोलंबिया ही शहरे वाहतूक कोंडीत टॉप टेन आहेत.
“जी-20′ परिषदेत नुसत्याच चर्चा
पुण्यात झालेल्या “जी-20′ परिषदेच्या चर्चेत वाढते शहरीकरण, वाहतुकीच्या समस्यांबाबत मोठा खल झाला. एकंदरीत फक्त भारतच नव्हे, तर जगातील बहुतांश देशांमध्ये आता वाहतूक कोंडी हे प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे जी-20 सारख्या झगमगीत परिषदा दरवर्षी होत असल्या, तरी त्यातून आतापर्यंत ठोस काही मार्गदर्शक काम वाहतूक कोंडी या विषयात झालेले दिसून येत नाही.