पुणे – कमवा व शिका योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

“एनएसयुआय’ची पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडे मागणी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “कमवा व शिका योजने’चे मानधन वितरित करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी त्वरित करावी आणि दोषी लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी एनएसयुआयतर्फे विद्यापीठाच्या प्रशासनाकडे केली आहे.

विद्यापीठातील कमवा व शिका योजनेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठाने माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीकडून चौकशी सुरू आहे. मात्र, याप्रकरणी तातडीने चौकशी होणे आवश्‍यक आहे. ही योजना कर्मवारांच्या ज्या पवित्र संकल्पनेतून आली आहे. त्या पवित्र विचारांचे पावित्र्य राखले जावे. तसेच भ्रष्टाचार प्रकरणाची ही चौकशी येत्या 8 दिवसांत पूर्ण करून सत्य बाहेर आणावे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे सतीश पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या योजनेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. ही योजना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असून ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची जीवनदायिनी आहे. अशायोजनेत आर्थिक अनियमिता होणे ही बाब दुर्देवी आहे. कोणत्याही कारणाने कमवा व शिका योजना बंद करू नये. तसेच या योजनेत यापुढेही मागेल त्या गरजू विद्यार्थ्याला काम मिळावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.