पुणे – मागील वर्षी फिरत्या विसर्जन हौदांसाठी काही कोटी रुपये खर्च करूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने यंदापासून हे फिरते हौद बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, समाविष्ट गावांसाठी लोखंडी हौद आणि मूर्तीदान केंद्राची संख्या वाढविले जाणार आहेत.
गणेशोत्सवात होणारे नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती वापरण्यासह, कृत्रिम हौदात मूर्ती देण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच मूर्तीदान केंद्र उभारली जात आहेत. त्याला पुणेकरांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, करोना काळातील गणेशोत्सवात विसर्जन घाटांवरील गर्दी रोखण्यासाठी पालिकेने कृत्रिम विसर्जन हौद उपलब्ध करून दिले होते. पुढे दोन वर्षे हा उपक्रम सुरू होता.
मागील वर्षी महापालिकेने शहरात दीडशेपेक्षा जास्त विसर्जन हौद उपलब्ध करून दिले होते. मात्र, 10 टक्के गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. या हौदांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, वाहनांचे वेळापत्रक, मार्ग, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार प्रतिसाद देण्यासाठीही अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे लागते. यातून गोंधळाचे वातावरण निर्माण होते. यावर शहराच्या विस्तारानुसार तसेच अधिक गरज असेल, तेथे जागेच्या उपलब्धतेनुसार विसर्जन हौद बांधण्यासाठी नियोजन करणार आहे.