पुणे – नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वी कांदा तेजीत होता. नवीन लाल कांद्याची नगर, सोलापूर, पुणे बाजार समितीच्या आवारात आवक वाढल्याने कांदा भावात घसरण झाली आहे. निर्यातबंदी, तसेच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविल्याने भावात मोठी घट झाली आहे.
किरकोळ बाजारात लाल कांद्याचे प्रतिकिलोचे भाव २५ ते ३० रुपये दरम्यान आहेत. घाऊक बाजारात दहा किलो कांद्याचे भाव १५० ते २५० रुपये दरम्यान आहेत. नवरात्रोत्सवानंतर घाऊक बाजारात जुन्या कांद्याची आवक कमी होत गेली. कांद्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे कांदा भावात अचानक मोठी वाढ झाली. किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे भाव ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. कांदा भाववाढीची झळ ग्राहकांना एक ते दीड महिना सोसावी लागली, असे मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
दिवाळीनंतर नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली. लाल कांद्याची लागवड पुणे जिल्ह्यातील शिरुर तसेच नगरमधील पारनेर, श्रीगोंदा परिसरात केली जाते. नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारात सुरू झाली आहे. सोलापूर बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी (२२ डिसेंबर) ६०० ट्रक इतकी लाल कांद्याची आवक झाली.
गेल्या आठवड्यात सोलापूर बाजार समितीच्या आवारात १,२०० ट्रक लाल कांद्याची आवक झाली होती. नगर, बीड परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविल्याने भावात घट झाली. रविवारी मार्केट यार्डातील बाजार आवारात १५० ट्रक कांद्याची आवक झाली. राज्यातील प्रमुख बाजार समितींच्या आवारात लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
कांदा दरात तूर्तास वाढ नाही
दीड महिन्यापूर्वी तेजीत असलेल्या कांदा भावात घट झाली आहे. निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाल कांदा विक्रीस पाठविला. फेब्रुवारीत उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू होणार आहे. सध्या बाजारात कांदा मुबलक उपलब्ध असून, तूर्तास कांदा दरात वाढ होणार नाही.