महापालिकेतील दोन आरोग्यप्रमुखांसह तीन मुख्य अधिकारी रजेवर
पुणे – महापालिकेतील दोन आरोग्यप्रमुखांसह, एक सह आरोग्य प्रमुख असे तीन जण रजेवर असल्याने दुसऱ्या सह आरोग्य प्रमुखांवर तिघांची जबाबदारी देण्यात आली आहे. तिघांमधील दोघांना करोनाची बाधा झाली असून, आरोग्य प्रमुखांना मधुमेहाचा त्रास होत असल्याचे तेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांच्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
करोनाचा उद्रेक रोखण्यात आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. महापालिकेची भूमिका त्यात महत्त्वाची असल्याने एक आरोग्य प्रमुखाऐवजी राज्य सरकारने डॉ. नितीन बिलोलीकर यांची महापालिकेत दुसरे आरोग्यप्रमुख म्हणून नियुक्ती केली. दि.25 जुलै रोजी ही नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे हे प्रकृती स्वास्थ्यामुळे ते 10 दिवस रजेवर गेले होते. त्याकाळात पर्यायी व्यवस्थेची मागणी केली जात होती. त्यावेळी डॉ. बिलोलीकरांची नियुक्ती करण्यात आली.
मात्र जेमतेम आठ-पंधरा दिवसांच्या त्यांच्या कामानंतर डॉ. बिलोलीकर यांना करोनाची लागण झाली आणि ते रजेवर गेले. आजपर्यंत ते रुजू झाले नाहीत. त्यांच्यानंतर करोनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. संजीव वावरे यांनाही करोनाची लागण झाल्याने तेही रजेवर गेले आहेत. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून डॉ. हंकारे यांना मधुमेहासंबंधीचा आजार बळावल्याने तेही रजेवर गेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला कोणीच वाली नसल्याचे दिसत आहे. या सगळ्यांची जबाबदारी डॉ. अंजली साबणे यांच्याकडे देण्यात आली आहे. जम्बो कोविड हॉस्पिटल आणि अन्य विषयही त्यांच्याकडेच देण्यात आले आहेत. असे असताना “त्या कॉल रिसिव्ह करत नाहीत’, “लोकप्रतिनिधींना मदत करत नाहीत’ अशी ओरड नगरसेवक करत आहेत.
…हे तर आमचे खच्चीकरण
“वास्तविक, करोना संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही काम करूनही अशाप्रकारे तक्रार केली जात आहे. यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होत आहे. शहराच्या आरोग्यसह आम्हाला आमच्याही आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे आम्हाला समजून घ्या,’ अशी भावना आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी व्यक्त करत आहेत.