लोणी काळभोर -हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील करोना बाधीत रुग्णांच्या सोईसाठी लोणी काळभोर येथे मंगळवारी (दि. 15) कोणत्याही परिस्थितीत शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला रविवारी (दि. 13) सकाळी दिले.
लोणी काळभोर येथील एमआयटी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाच्या इमारतीत पहिल्या टप्प्यात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याने, पुर्व हवेलीमधील रुग्णांची बेडसाठीची धावपळ काही प्रमाणात तरी थांबणार असल्याचा दावा आयुष प्रसाद यांनी केला आहे. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात मागिल दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी जिल्हा परिषदेने निधी देण्यास नकार दिल्याने, बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली होती.
नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार अशोक पवार यांनी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महसूल विभाग व विश्वराज हॉस्पिटल प्रशासन यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीनंतर आयुष प्रसाद यांनी शंभर बेडचे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले.
यावेळी आमदार अशोक पवार, हवेली पंचायत समितीचे उपसभापती युगंधर काळभोर, विश्वराज हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. अदिती कराड, व्यवस्थापक डॉ. पी. के. देशमुख, तहसीलदार सुनिल कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. डी. जे. जाधव आदी उपस्थित होते.
आयुष प्रसाद म्हणाले, राज्य शासनाकडून डॉ. रखमाबाई राऊत योजनेस मुदतवाढ न मिळाल्याने, जिल्हा परिषद विश्वराज हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटरसाठी निधी देणे अवघड झाले आहे. त्याऐवजी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. नवे सेंटर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग चालवणार असल्याने, बंद करण्याचा प्रश्नच उभा राहणार नाही.
पूर्व हवेलीमधील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पहिल्या टप्प्प्यात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर मंगळवारपासून एमआयटी शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलच्या इमारतीत तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. गरज भासल्यास आणखी बेड वाढवण्याच्या सुचना आरोग्य विभागाला केलेल्या आहेत. यापुढील काळात कोविड केअर सेंटर बंद पडल्यास अथवा रुग्णांची गैरसोय झाल्यास अजिबात खपवून घेतले जाणार नाही. आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घ्यावी.
-अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली