कात्रज – महादेवनगर येथील सर्वे नंबर 38 आर.के.कॉलनी व सर्वे नंबर 36 स्वामी समर्थ नगर येथील जैवविविधता क्षेत्रांतर्गत (बीडीपी) आरक्षित जागेवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग-2च्या वतीने धडक कारवाई करीत सुमारे पाच हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.
महापालिका अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, प्रभारी कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या नियंत्रणाखाली शाखा अभियंता प्रशांत मोरे, कनिष्ठ अभियंता अभिजीत भुजबळ, उमेश गोडसे यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन ब्रेकर, दोन गॅस कटर, अतिक्रमण विभाग कर्मचारी व पोलीस सुरक्षित कारवाई करण्यात आली. कात्रज डोंगर उतारावर बीडीपी आरक्षण क्षेत्रावर अनधिकृतपणे प्लॉटिंग उभारण्यात आले होते.
तसेच, पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बांधकामे सुरू केली होती, अशा जागा मालकांना पालिका बांधकाम विकास विभागाने नोटीस देऊन काम थांबविण्यास सांगितले होते. मात्र काम न थांबवल्याने अतिक्रमण कारवाई करण्यात आल्याचे शाखा अभियंता प्रशांत मोरे यांनी सांगितले. या कारवाईने कात्रज, आंबेगाव परिसरातील अनधिकृतपणे बीडीपी झोन मध्ये बांधकाम करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
महादेवनगर टेकडीवर आर.के.कॉलनी परिसरात बिडीपी आरक्षित क्षेत्रावर अनधिकृत प्लॉटिंगवर यापूर्वी मोठी कारवाई केली होती. त्या ठिकाणी सुरू अनधिकृत बांधकामांना नोटिसा देऊन कामे सुरू ठेवल्याने कारवाई करण्यात आली. बिडीपी क्षेत्रावर नागरिकांनी अनधिकृत प्लॉटिंग घेऊन बांधकामे करू नयेत. कारवाई नियमित सुरू राहणार आहे. – प्रशांत मोरे, शाखा अभियंता