हडपसर – गेल्यावर्षी केलेल्या दुरूस्तीच्या कामाची तपासणी करण्यासाठी येथील उड्डाणपुलावरून सोलापूरकडील व सासवड मार्गावर होणारी वाहतूक बंद केल्याने पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी दिवसभर कायम होती तर रात्री उशीरा ट्रॅव्हल्सच्या गाड्यांची भर त्यात पडल्याने पंधरानंबर ते रामटेकडी किर्लोस्कर पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
हडपसर उड्डाणपुलाची तपासणी करण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस त्यावरील सोलापूर व सासवडकडे होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील मगरपट्टा चौक ते रविदर्शन चौक या सुमारे दोन किलोमीटर अंतरात वाहनांच्या रांगा लागून दिवसभर कोंडी झाली. कोंडीत अडकल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. कामगार, नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आदींना तासन् तास कोंडीत अडकून पडावे लागले. चाकरमान्यांना वेळेवर कार्यालयात तसेच कंपनी अस्थपानात वेळेवर पोहचता आले नाही.
वाहतूक पोलिसांनी या वाहतुकीचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एका अधिकाऱ्यासह 20 पोलीस कर्मचारी वाहतूक नियमन करण्यासाठी गुंतले आहेत. त्यामुळे संथगतीने का होईना वाहतूक पुढे सरकत आहे. पर्यायी रस्ते नसल्याने पुलाखालील मार्गावर वाहनांचा मोठा ताण आला. सकाळी व सायंकाळी एकाचवेळी मोठ्याप्रमाणात वाहने रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा दूरवर खोळंबा होत आहे. ही वाहनांची रांग पुलाच्या मागेपुढे दोन्हीही बाजूने वाढत असल्याने रूग्णवाहिकांना काही काळ अडकून पडली होती.
“ती’ मीटींग म्हणजे पोकळ गप्पा…
हडपसर उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाला म्हणून गेल्यावर्षी फेब्रुवारी 2022मध्ये हा पूल वाहतुकीस तब्बल महिनाभर बंद ठेवला होता.पुलाची तपासणी करून दुरुस्तीचे कामही त्यावेळी करण्यात आले. दरम्यान महिनाभर येथील नागरीकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पूल वाहतुकीस बंद होता आणि वाहतूक कोंडी होत होती त्यावेळी येथील पर्यायी मार्ग तसेच भविष्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास काय करता येईल, यावर संबंधित अधिकारी, जाणकार, लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी, काही संघटनांचे सदस्य यांच्यामध्ये मीटींगसह मोठा उहापोह झाला. मात्र, वर्षे लोटले आणि आज प्रत्यक्ष पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्यानंतरही झालेल्या मिटींगा म्हणजे पोकळ गप्पाच ठरल्याचे दिसून येत आहे.
आय.आर.सी.च्या नियमानुसार उड्डाणपुलावरील लोड टेस्टिंग करण्याचे काम मध्यरात्री पासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने लोडची वाहने पुलावर थांबवून ही तपासणी करण्यात येत आहे. लोड संदर्भातील बेअरिंगचे काम झाले असले तरी तपासणी महत्त्वाची आहे, ते काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात येईल.
– श्रीनिवास बोनाला, विशेष प्रकल्प प्रमुख, महापालिका