रांजणगाव/ शिक्रापूर-पोलीस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी पत्नी, सासरा आणि मेहुणा यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करीत तिघांना अटक करण्यात आले आहे.
शिरुर पोलीस स्टेशन येथे नोकरी केलेले व सध्या शिक्रापूर येथे नेमणूकीस असलेले पोलीस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) सांयकाळी कारेगाव येथील नवलेमळा येथे आत्महत्या केली होती. मांडगे यांच्या मृत्यूस त्यांची पत्नी, सासरा आणि मेहुणा जबाबदार असल्याची फिर्याद पोलीस कर्मचारी मांडगे यांची बहीण मनीषा इथापे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तिघांना तातडीने अटक केली आहे.
मयत जितेंद्र मांडगे यांची पत्नी पूजा जितेंद्र ऊर्फ हरीभाऊ मांडगे (वय 27), सासरे संजय बबन दळवी (वय 53), मेहुणा शशांक संजय दळवी (वय 29, सर्व रा. हंगा, ता पारनेर, जि अहमदनगर) यांनी मांडगे हे शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असताना त्यांच्यावर सुपा पोलीस ठाणे येथे वेगवेगळे दखलपात्र गुन्हे दाखल केले होते.
अटकेच्या भीतीने तसेच मांडगे यांची पत्नी पूजा हिने घटस्फोट घेण्यासाठी 36 लाख रुपये तसेच 7 एकर जमिनीची मागणी करून पोलीस कर्मचारी जितेंद्र मांडगे यांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांच्या पत्नीसह, सासरा व मेहुणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे करीत आहेत.