मंचर/पारगाव -पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने लागवड हंगाम 2022-23 मध्ये ऊस लागवडीसाठी को 86032, कोव्हीएसआय 18121, एमएस 10001 या जातीस मे 2023 अखेर मुदतवाढ दिली असून, या नोंदीचा ऊस गाळप हंगाम 2023-24 अखेरीस तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
बेंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभेमध्ये चालू वर्षी ऊस लागवड कमी झाल्याने आणि खोडवा ऊस राखण्याचे प्रमाण कमी असल्याने झालेल्या निर्णयानुसार मे 2023 अखेर को 86032, कोव्हीएसआय 18121, एमएस 10001 जातीचे ऊस लागवडीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, हा ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये गाळपास घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे सध्या कांदा, भाजीपाला-तरकारी ही पिके काढल्यानंतर ऊस उत्पादकांना एप्रिल 2023 मध्ये बेणेद्वारे,
ऊस रोपांद्वारे आणि मे 2023 मध्ये फक्त रोपांद्वारे ऊस लागवड करतील त्यांची ऊस नोंद घेतली जाऊन गाळप हंगाम 2023-24 अखेरीस तोडणी केली जाणार आहे. आडसाली ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्याने ऊसाची तोडणी 17 ते 18 महिन्यानंतर होत असल्याने कारखान्याचे हे धोरण कालावधीत लागवड केलेला ऊस 10 ते 11 महिन्यातच गाळपास जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये लागवड करण्याबाबत सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण आहे.
कार्यक्षेत्र व परिसरातील गटातील गावांमध्ये लागवड मुदतवाढ योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक बेणे, ऊस रोपे, जिवाणू खते, रासायनिक खते आदी पुरवठा प्रचलित “दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ’ या ऊस विकास योजनेतील धोरणानुसार केला जाणार आहे.
कारखान्याने यापूर्वी पुढील हंगामात गाळपास येणाऱ्या खोडवा ऊसासाठी 100 रुपये प्रति मेट्रिक टन अनुदानपर दर, तसेच 100 टक्के अनुदानावर (मोफत) पाचट कुट्टी आणि 50 टक्के अनुदानावर कारखाना उत्पादित जिवाणू खते वाटप करणेची योजना जाहीर केली आहे.
या बाबींचा विचार करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरील योजने प्रमाणे फक्त ऊस रोपांद्वारे ऊस लागवड करावी. जास्तीत जास्त खोडवा राखून कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस लागवड, खोडवा व्यवस्थापन व ऊस विकास योजनांच्या अधिक माहितीसाठी कारखान्याच्या विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा.
– प्रदीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, भीमाशंकर कारखाना