शिक्रापूर -कोंढापुरी (ता. शिरुर) येथील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या शाळेत महिलेने आजारी असल्याने सुट्टी घेतल्यानंतर एक जानेवारी 2023 रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी आलेल्या पोलिसांसाठी लावलेल्या चहा, नाष्टाच्या पुरवण्याच्या स्टॉलमधील पोलिसांना नाष्टा पुरवल्याने संस्थेच्या संचालकांनी महिलेला त्याबाबत नोटीस देऊन नोकरीवरून काढले. संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संबंधित महिलेने केली आहे.
कोंढापुरी येथील स्कूलमध्ये ही महिला नोकरीला असून त्या आजारी असल्याने त्यांनी (दि.27) डिसेंबर 2022 पासून सुट्टी घेत असल्याचे व्यवस्थापकांना सांगून सुट्टी घेतली. एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये आलेल्या नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महिलेच्या मुलाने चहा नाष्ट्याचा स्टॉल लावला होता. याबाबतची माहिती संस्था चालकांना मिळाली.
संस्था चालक यांनी खोटे कारण सांगून सुट्टी घेतल्याबाबतचे नोटीस महिलेला दिली. संबंधित महिलेने पोलीस अधीक्षकांसह शिक्रापूर पोलीस व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र देऊन संस्था चालक व संस्थापक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी संस्था चालक डॉ. अनिता माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
तक्रार अर्ज आल्यास पुढील कार्यवाही करू
शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी म्हणाले की, कोंढापुरी येथील घटनेबाबत संबंधित महिलेने शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिलेला असून पोलीस त्याबाबत चौकशी करतील तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून आपणाकडे अर्ज आल्यास आपणदेखील त्याबाबतची चौकशी करुन पुढील कार्यवाही करु असे यांनी सांगितले.