– नीलकंठ मोहिते
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा-भीमा आणि बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील या दोनही सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकरी सभासदांचे पेमेंट थकल्याने शेतकऱ्यांची चूल पेटण्याची भ्रांत निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी गावोगावी आक्रोश सुरू केला आहे, तर राष्ट्रवादी व भाजपमध्ये शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलावर कलगीतुरा सध्या सुरू झाला आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने आगामी निवडणुकीत विरोधक रान उठवून उसाच्या बिलावर राजकारण गाजवणार हे मात्र निश्चित!
इंदापूर तालुक्यात माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा कायमच आहे. सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार भरणे यांनी बाजी मारत आमदारकी पटकावली. तरी देखील माजी मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे नीरा-भीमा, कर्मयोगी या दोन्ही कारखान्यांचे निवडणुकीत राष्ट्रवादीने कधीही भाग न घेता केवळ शेतकरी हितासाठी निवडणुका बिनविरोध केल्या. तरी देखील कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडते कसे, असा सवाल सभासदांमधून उमटत आहे.
हे कोडे अद्याप सुटलेले नाही
कारखान्यातून पार्टीचे पेमेंट होते; मात्र शेतकऱ्यांचे ऊस बिल का रखडते? दौंड शुगर, अंबालिका, माळेगाव साखर कारखाना या बरोबरीने कर्मयोगी व नीरा भीमा का दर देत नाही. इच्छुक शेतकऱ्यांना सभासद का करून घेतले जात नाही. याचे कोडे आजपर्यंत कोणालाही सुटलेले दिसत नाही. कारखान्याच्या कामगारांचे पगार वेळेवर होत नाहीत. यासाठी काही ठराविक बॅंक मनापासून साथ देत नाही, अशी नुसती ओरड होते; मात्र यावर तोडगा काढले जात नाही.
आर्थिक घडी कधी ताळावर येणार?
नीरा-भीमा व कर्मयोगी या साखर कारखान्यांची आर्थिक विस्कटलेली घडी कधी ताळावर येणार? केंद्र सरकार या कारखान्यांना मदत करण्याची भूमिका दाखवते आहे; मात्र त्यासाठी संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शेतकरी सभासद यांनी एक जिवाने नियोजन करावे लागेल. राजकारणासाठी दोन्हीही साखर कारखान्यांचा पैसा विनाठाई खर्च करू नये. तरच, आगामी काळात विस्कटलेली आर्थिक घडी सुस्थितीत होईल; अन्यथा दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी पोरका होईल, असे बोलले जात आहे.
“तेव्हा’ गुपित उघडे करणार – आमदार भरणे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कधीही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करताना राजकारण केलेले नाही, असे खडे बोल आमदार दत्तात्रय भरणे यांनी कारखान्याला कर्ज देण्यासाठी अडवणूक या विषयावर विरोधकांना केले आहेत.
माझ्याकडे दोन्हीही साखर कारखान्याची गुप्त माहिती आहे. वेळ आल्यावर उघड करेल, असा इशारा आमदार तथा माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्यामुळे, आमदार भरणे नेमकी काय गुप्त माहिती शेतकरी सभासदांपुढे आगामी काळात उघड करणार, याची उत्सुकता लागली आहे.