इंदापूर -निरवांगी (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांची नागरिकांची आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व वीज ग्राहकांची नवीन वीज उपकेंद्र मंजूर करावे, अशी मागणी सातत्याने होती. याच मागणीनुसार शासनाकडे पाठपुरावा करून 10 एमव्हीए क्षमतेचे नविन उपकेंद्र मंजूर केले आहे. हेच नवीन वीज उपकेंद्र शेतकऱ्यांना वरदान ठरेल, अशी माहिती आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आमदार भरणे म्हणाले की, या उपकेंद्रामुळे खोरोची, निरवांगी, निमसाखर, दगडवाडी, सराफवाडी व घोरपडवाडी या गावांना फायदा होणार आहे. योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. यामुळे सततचे विद्युत रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी होणार आहे. वीज ग्राहकांचा अनावश्यक खर्च वाचणार आहे. तसेच नवीन विज जोडणी तात्काळ मिळण्याकामी फायदा होणार आहे.
यासाठी कृषी धोरण अंतर्गत जिल्हास्तरीय निधीतून मंजुरी देण्यात आली आहे. या निरवांगी उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी वर्ग, व्यवसायिक व औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे, अशी ही माहिती आमदार भरणे यांनी दिली. या मंजूर झालेल्या उपकेंद्रामध्ये पाच एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे आमदार भरणे यांनी नमूद केले.