आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात मातृ-पितृ पूजन सोहळ्याची सुरुवात माऊलींच्या मूर्ती पूजनाने करण्यात आली. आयुष्य एक दिवा आहे, पण त्याच दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजेच आई-वडील असतात. अशा आई-वडिलांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही म्हणूनच त्यांच्या प्रति प्रेमभाव, आदर, कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले परम कर्तव्य आहे.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, मंजुश्री वडगावकर, पत्रकार अर्जुन मेदनकर, आजी-आजोबा, आई-वडील उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत आई-वडिलांचे महत्त्व विशद केले. सचिव अजित वडगावकर यांनी आई-वडील हे माऊलींचे रूप असून, आपल्या जडणघडणीत व जीवन यशस्वी करण्यात त्यांचा मोठा सहभाग असतो, अशा माऊलींचे पूजन प्रशालेत दरवर्षी होत आहे ही आनंदाची बाब आहे, असे मत व्यक्त केले.
हा सोहळा दरवर्षीप्रमाणेच भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावर्षी आई-वडिलांबरोबरच आजी-आजोबादेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी इतर भाषांमध्ये आई-वडिलांना काय म्हणतात, याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना माता-पित्यांचे पूजन कसे करावे, याविषयीचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे पूजन करत नतमस्तक झाले. याप्रसंगी आई-वडिलांनी मुलांना आशीर्वाद दिले.
त्यानंतर एकमेकांना गोड खाऊ भरवण्यात आला. यावेळी मुलांनीदेखील आई-वडील, गुरुजनांचा आदर करण्याचा संकल्प केला. यावेळी वर्षा काळे, निशा कांबळे, वैशाली शेळके, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण या सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता माऊलींच्या पसायदानाने झाली.