लोणंद -येथील पालखी महामार्गावर शासकीय विश्रामगृहासमोर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एकजण किरकोळ जखमी झाला.
या अपघाताची अधिक माहिती अशी, सोमवार दि. 27 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच 42 एयू 6609) व आयशर ट्रक क्रमांक (एमएच 16 एवाय 9300) यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दत्तात्रय किसन जाधव (वय 50, रा. निंबूत छपरी, ता. बारामती) हे गंभीर जखमी झाले. अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या समवेत दुचाकीवर असलेले सतीश लक्ष्मण लकडे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
हा अपघाता लोणंद येथील शासकीय विश्रामगृहासमोर घडला. दोन्ही वाहने लोणंद वरून निरेच्या दिशेने जात होती, अशी माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी दाखल केले. तर अपघातात ठार झालेल्या जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या अपघाताची नोंद करण्याचे काम संध्याकाळपर्यंत लोणंद पोलीस ठाण्यात सुरु होते.