विजय शिंदे
वडापुरी -2024 मधील आगामी बारामती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत रणनीती आखण्याचा प्रयत्नही सुरू झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या फुटीनंतर आता बाळासाहेबांची शिवसेना मोर्चेबांधणीसाठी मैदानात उतरली आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यातून बारामतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यातील शिवतारे यांचे मोर्चेबंधन गावागावांत पोहचविण्यासाठी शिंदे ब्रिगेड कामाला लागली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील दौऱ्यानंतर भारतीय जनता पक्षाचे इतर नेतेही या मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. अशातच शिंदे गटातील नेते, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही कार्यकर्ते आपल्या गळाला लावत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हाती शिवबंधन बांधले आहे. यात इंदापूर अग्रस्थानी आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात शिंदे गट उभा करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, शिवतारे यांना हे आव्हानच मानले जात आहे.
माजी मंत्री शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, बारामती, पुरंदर, हवेली, दौंड, भोर- मुळशी- वेल्हा अशा सर्व तालुक्यांतील वधू-वरांची एकत्रित नोंदणी करीत मे महिन्यात शिवतारे मित्र मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी तालुकानिहाय कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यांनी आयोजन केलेल्या विवाह सोहळ्यात वधू किंवा वर हे बारामती लोकसभा मतदारसंघातील असावेत, अशी अट आहे. त्यामुळे आगामी काळात विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढू नये, बॅंका, पतसंस्था किंवा सावकारांच्या कठोर वसुलीना त्यांना तोंड देण्याची वेळ येऊ नये या हेतूने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र, या माध्यमातून बारामतीच्या शिवारात मशागत करण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे आता दडून राहिले नाही.
लोकसभेसाठी प्रबळ इच्छा दाटली
बारामती लोकसभेची निवडणूक लढविण्यास माझी तयारी आहे. असे विजय शिवतारे यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे विजय शिवतारे हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. ते भविष्यात भाजपाचे कमळ हाती घेऊन लोकसभेस सामोरे जाणार की ही जागा शिंदे गटाला सुटणार, हे येणाऱ्या वर्षभरात स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वीचे बारामतीचे रण भाजप, शिंदे गटाकडून तापविले जात आहे.