बारामती -सर्व विभागांनी “महाराजस्व’ अभियान यशस्वीपणे राबवून लाभार्थींना विविध योजना आणि सेवांचा लाभ गतीने आणि विहित कालमर्यादेत पुरवावा, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले. उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि अन्य सर्व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन बारामतीत करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रांताधिकारी बोलत होते.
या कार्यक्रमास तहसीलदार विजय पाटील, परिविक्षाधीन तहसीलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरोदे-देवकाते, उपमुख्याधिकारी पद्मश्री दाईंगडे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका सस्ते, परिविक्षाधीन-नायब तहसीलदार तुषार गुजवटे यांसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी कांबळे म्हणाले, नागरिकांना विविध विभागातील योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी तालुका स्तरावर “महाराजस्व’ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्या योजनांसह भूसंपादनाच्या नोंदी निर्गत करण्यात येणार आहेत. तालुक्यातील मंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातही हे अभियान राबविण्यात येत आहे.
तहसीलदार विजय पाटील म्हणाले, हे अभियान 30 एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे. शासकीय विभागाकडून दिले जाणारे परवाने, दाखले, प्रमाणपत्रे आदींसह गावातील रस्ते, वहिवाटीचे कामे, फेरफार नोंदी निर्गत करणे, अतिक्रमण काढणे, अकृषक परवाना आदी प्रलंबित कामांचा निपटाराही या माध्यमातून होणार आहे.
अभियानांतर्गत असे दिले लाभ
26 जानेवारीपासून 558 शिधापत्रिका, 392 लाभार्थींना संजय गांधी निराधार योजना अनुदान पत्र, 10 लाभार्थींना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 41 हजार रुपयांचे अनुदान वाटपाचे पत्र, 2 भोगवटा सनद, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे 138 नूतनीकरण परवाना, 868 शिकाऊ परवाना,
कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान 2022-23 अंतर्गत 2 ट्रॅक्टर, एक मेकॅनिकल रिव्हर्सिबल सिंगल पल्टी नांगर, एक रोटाव्हेटर, पंचायत समितीकडून 93-3 एचपी पाणबुडी मोटार, 76-5 एचपी पाणबुडी मोटार, 36 सरी रिझट, 81 ताडपत्री, 22 क्रेट्स, 60 बॅटरी पंप, बारामती नगरपरिषदेमार्फत 368 लाभार्थींना पंतप्रधान स्वनिधी प्रमाणपत्र आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून 155 मोजणीचे नकाशे वाटप.