पुणे – ससून रुग्णालयात रोबोटिक हॅंडच्या साहयाने एका रुग्णाची दुर्बिणीद्वारे अपेंडिक्सची शस्त्रक्रिया मंगळवारी दि. 7 रोजी करण्यात आली. शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे ससून रुग्णालय महाराष्ट्रात प्रथम ठरले आहे.
येरवडयातील रवी कुमार चव्हाण या 22 वर्षीय तरूणावर ही अपेंडिक्सची शस्त्रक्रिया ससून रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अमेय ठाकुर यांनी अवघ्या 45 मिनिटांत केली. एरवी यासाठी तास ते दीड तास लागतो. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रायोगिक तत्वावर करण्यात येत असून जर त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून आले तर रोबोटिक हॅंड साधन खरेदी करून पुढील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातही आता तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला असून आता रोबोट रुग्णांवर वेगवेगळया शस्त्रक्रिया करत आहेत. मात्र, रोबोटला चालवणारा हा सर्जन असतो. तसेच, रोबोट खरेदीसाठी 10 ते 20 कोटी रूपये लागतात. तसेच त्याचा मेंटेनन्स ठेवणे, स्वतंत्र खोली, कन्सोल रूम अशी व्यवस्था करावी लागते. एकंदरित ही खर्चिक प्रक्रिया आहे. तर रोबोटिक हॅंडची निर्मिती करणारी ही खासगी कंपनी गुजरातमधील असून ते ससून रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करत आहेत.
रोबोटिक हॅंडद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे
शस्त्रक्रिया करताना टाके टाकण्यासह विविध साधने असून ते शस्त्रक्रियेदरम्यान बदलता येतात
यामुळे सर्जनला सहजपणे शस्त्रक्रियेस मदत होते, थकवा येत नाही, वेळेची बचत होते.
शस्त्रक्रियेत अधिक अचूकता येते
काय आहे रोबोटिक हॅंड?
दरम्यान, रोबोटिक हॅंड हे एक सॉफटवेअरचा प्रोग्राम असलेले साधन आहे. ते पिशवीमध्ये कोठेही घेउन जाता येते, कारण तो केवळ एक यांत्रिक हात असतो. तो विजेवर चालतो. डॉक्टरांचा हात टाके घालण्यासाठी 360 अंशात फिरत नाही. मात्र, हे काम रोबोटिक हॅंड सहजपणे करतो. त्यामुळे रुग्णाची शस्त्रक्रिया लवकर होते, अशी माहीती मेरिल कंपनीचे अभिजित भावसार यांनी दिली.
महिनाभर या रोबोटिक हॅंडचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात येतील. त्याचे परिणाम योग्य दिसल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ते ससून रुग्णालयातील रूग्णांसाठी खरेदी करण्यात येईल.
– डॉ. संजीव ठाकुर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय