मंचर -पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनखात्याने सुरक्षित विहिरीबाहेर काढल्याची घटना सोमवारी (दि. 20) सकाळी घडली. बहुधा एखाद्या प्राण्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
पिंपळगावातील मधला मळा येथे गणपत कोंडाजी बांगर यांची विहीर आहे. ते कृषीपंपाची मोटर चालू करण्यासाठी विहिरीवर सकाळी गेले असता बिबट्याची डरकाळी ऐकल्यावर त्यांनी विहिरीत पाहिले असता बिबट्या विहिरीतील लोखंडी अँगलच्या कठड्यावर बसलेला दिसला.
संतोष बांगर यांनी ही घटना ग्रामस्थांसह वनखात्याला कळवली. त्यानुसार वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या अडीच ते तीन वर्षे वयाचा असल्याचे वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.