पुणे-पेरणे फाटा येथे विजय रणस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी अनुयायांची होणारी गर्दी विचारात घेता पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनुयायांची सुरक्षा लक्षात घेता यंदा पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पुणे पोलिसांच्या मदतीसाठी बाहेर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. होमगार्ड, एसआरपीएफ, रॅपिड ऍक्शन फोर्स असा मोठा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त, सह आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चार अप्पर पोलीस आयुक्त, पंधरा पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्तांसह शेकडो वरिष्ठ अधिकारी आणि पाच हजार पोलीस कर्मचारी, बीडीडीएसची अकरा पथके, सहा क्यूआरटी, आठ एसआरपीएफच्या तुकड्या असा बंदोबस्त असणार आहे. तसेच कार्यक्रमास्थळी 250 सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
करोनाच्या निर्बंधमुक्तीनंतर यंदा प्रथमच विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्यभरातून अनुयायी येतात. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा, पोलीस प्रशासनाकडून देखील चोख नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली चार अप्पर पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त, 21 सहायक पोलीस आयुक्त, 90 पोलीस निरीक्षक, 250 सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह चार हजार अंमलदार, एक हजार होमगार्ड, बीडीडीएसची 11 पथके, 5 आरसीपी स्ट्रायकिंग, एसआरपीएफच्या 8 तुकड्या असा तगडा बंदोबस्त असणार आहे.
पोलीस बंदोबस्ताशिवाय विजय रणस्तंभ परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्पॉटर किट व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय व्हिडीओ कॅमेरा व ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमाची निगराणी करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या अनुयायांच्या वाहन पार्किंगसाठी स्लॉट तयार करून देण्यात आले आहेत.