राहू -नांदूर (ता. पुरंदर) येथील फ्लिटगार्ड या कंपनीच्या सीएसाआर फंड विभागाच्या सहसमन्वयक प्रियंका चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिराचे राहू येथे मंगळवारी (दि. 13) आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन राहूचे सरपंच दिलीप देशमुख यांनी केले.
या प्रसंगी उपसरपंच गणेश शिंदे, चिमाजीबापू कुल, अरुण नवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश चव्हाण, अक्षय चव्हाण, संतोष ठोंबरे, नितीन कुंभार, प्राची कुलकर्णी उपस्थित होते. फ्लिटगार्ड कंपनी नांदूर व विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये विद्यार्थ्यांची कान, नाक, घसा, डोळे, दंत विकार, शुगर आदी आजारांची तपासणी करण्यात आली. याकामी विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. मन्मीत राजवाडे व त्यांची टिम यांनी तपासणी केली. या शिबिरासाठी केंद्र प्रमुख केळकर सेच मुख्याध्यापक शिवदास शिंदे व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचे विशेष सहकार्य लाभले.